जिव्हाळा

आमच्या कडे 1988साली दुष्काळ पडला होता. एक शेतकरी रस्त्याने जनावरे घेऊन उन्हात चालला होता. माझ्या वडिलांनी त्यातली एक कालवड 100 रु ला विकत घेतली. ती कालवड खिल्लारी जातीची होती. ती लक्ष्मी च्या रुपान आमच्या घरी आली. तिने सलग पाच गोऱ्हे आम्हला दिले.त्याकाळी आमची बागायती शेती कमी असल्यामुळे आमच्या चुलत्याचा एक बैल व आमचा एक बैल अशी सावड असायची,बैल गाडी व शेतीसाठी वापरायचो. मग उरलेले चार गोऱ्हे विकावे लागले.गाईला झालेला गोऱ्हा मोठा झाला की तो विकवा लागे. आम्हाला बागायत शेती कमी असल्यामुळे गाईला झालेला गोऱ्हा विकावा लागे.मोठा झालेला खोंड गोऱ्हा वडील बेल्हाच्या बाजारात वडील पायी 25 किमी. जात असत. बाजारात विक्रीसाठी गोऱ्हा उभा केला की वडील त्यास घासाची पेंढी प्रेमाने भरवीत असत.खा बाबा माझ्या हातचा शेवटचा घास.रानगवतावर वाढलेल्या त्या गोऱ्हाला घास जिलेबी बुंदी सारखा वाटे. वडिलांच्या मनात घालमेल सुरु असे 500 रु कमी मिळाले तरी चालतील पण गोऱ्हा शेतकऱ्याला ते देत असत.गिऱ्हाईक लागले, व्यवहार झाला की वडील त्या शेतकऱ्यास वडील बोलत असत. खूप गुणाचा गोऱ्हा आहे हा.तुमच्या शेतीची आणि घराची भरभराट होईल.मीच पाळला असता पण मला एवढी शेती नाही.आणि दोन दोन बैल पाळायला परवडत नाही.गोऱ्हा मालकाच्या ताब्यात दिला की वडिलांकडे पाहून हंबरत असे.ते पाहुन वडील धोतरच्या सोग्याने अश्रू लपवत असत.दुपार झालेली असते खूप भूक लागलेली असते.आणलेली भाकरी दोन घास खायला भेळ वाल्याचा आश्रय घेत.दोन रुपयाची भेळ घेतल्यावर भेळ वाला भाकरी खाऊ देत असे.ते खाताना पुन्हा आपला गोऱ्हा कुठं दिसतो का त्याची नजर शोध घेई. बाजारातून बाहेर पडेपर्यंतएकदा दोनदा गोऱ्हा नजरेस दिसतो का ते पाही.घरी येईपर्यंत सायंकाळ होई.लांबूनच वडिलांना पहिले की गाय हंबरत असे.वडील तिच्या जवळ येऊन अपराधी भावनेने तिच्या जवळ उभे राहत असत.गोमाता माफ कर मला म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरवत. आणि घरात येत.नाना आले खाऊ आणला म्हणून आम्हा भावांडाना आनंद होई.पण तो खाऊ खाताना वडिलांनी दिवसभराचा वृत्तांत सांगितला की मन खिन्न होई.प्राणी मात्रा बद्दल जिव्हाळा दया, उत्पन्न करणारे विद्यापीठ म्हणजे आमचे नाना.
लेखन 
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे 
अध्यक्ष 
पारनेर तालुका पदवीधर मुख्याध्यापक संघ 
जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अ. नगर 

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ