शिक्षणाच्या खाजगीकरणाचे धोके
*शिक्षणाच्या खाजगीकरणाचे धोके ...*
*✒️श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे ✒️*
कळस, पारनेर
9049271966
जगात आज सर्वत्र संगणक युग चालू आहॆ संपूर्ण जगात इंग्रजीचा बोलबाला चालू आहॆ अश्या युगात अगदी लहान मुलं सुद्धा मोबाईल सराईत पणे वापरत आहॆ, शिकली सवरली माणसे आणि अडाणी माणसे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने अँड्रॉइड मोबाईल वापरत आहेत.सध्याचे युग हे स्पर्धेचे,धावपळीचे, तंत्रज्ञानाचे युग आहे.या बद्दल कुणाचे ही दुमत असण्याचे कारण नाही.आमच्या आणि आधीच्या कित्येक पिढ्या या सरकारी शाळेत अत्यंत छान प्रकारे शिकल्या.सरकारी दवाखान्यात उपचार घेत मोठ्या झाल्या.प्रवासही सरकारी वाहनाने म्हणजे एस टी ने केला.सगळ्या सरकारी सुविधा वापरत आलो आहोत,कुठंच काही मोठा प्रॉब्लेम आला नाही.आमची वये झाली पण आम्ही या सर्व सरकारी सुविधा घेत जगलो.आता मात्र या सुविधा शेवटच्या घटका मोजीत आहेत.खाजगी वाहतूक इतकी झाली आहे कि स्वतःचं चार चाकी वाहन नसणे ही फार मोठी गरिबी समजली जाते.खाजगी कंपनीत पगार किती का असेना,पणशेजारचा मुलगा खाजगी शाळेत जातो म्हटल्यावर सवत इसाळ असल्याप्रमाणे आपली मुले श्रीमंत गणवेशात पिवळ्या रंगाच्या पॉश स्कूल बस मधून नामांकित महागड्या इंग्लिश स्कूलमध्ये जात नसतील तर त्यांच्या सारखे दुसरे दरिद्री कोणी नाही.ही आता गरिबी आणि श्रीमंती मोजण्याची मोजमापं होताहेत आणि आपण याला सर्वजण भुलतोय. दुरून डोंगर साजरे या उक्ती प्रमाणे खाजगी शाळांचे आकर्षण पालकांना असते. आपण फसलो गेलो आहोत,आपल्या हातून ही मोठी पापं होत आहेत.हे मात्र उशिरा समजते,
वास्तविक पाहता सरकारी सुविधा या कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त जनतेला विनासायास वापरता येणाऱ्या असतात.यात सरकार आपला नफा पाहत नाही तर जनतेच्या सुविधेसाठी त्या असतात.या उलट खाजगी एजंसी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल या उद्देशानेच मैदानात उतरलेल्या असतात. आता ज्यांचा हेतूच जास्तीचा नफा मिळवणे हा असेल त्यांना तुमच्या खिशाचा आणि तुमच्या भावनांचा काय सोस असणार आहे.पण आपलं कसं असतं, फुकट मिळतं ना मग त्याला काहीच महत्व नाही आणि जे आपण विकत घेतो त्याचे मात्र गुणगान गायचे.
कोरोना काळात किती खाजगी सेवा तुमच्या मदतीला आल्या याचा विचार करा व ठरवा.
आज जरी आपण या गोष्टीकडे डोळे झाक करून शांत बसत असलो तरी ही शांतता मनाला सुखावणारी नाही तर आपल्या पुढच्या पिढीस मारक ठरणारी आहे.धन दांडग्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या आणि गरीब मात्र अत्यवस्थ अशीच अवस्था होणार आहे.आपल्या सगळ्यांना काही गर्भ श्रीमंत उद्योजक होणे शक्य होणार नाही, अदाणी,अंबानी सारखे.त्यामुळे याच व्यवस्थेत जर आपल्याला जगायचं असेल तर निदान जे आपल्या साठी मारक ठरणार आहे त्याला विरोध करायची क्षमता सर्व सामान्य माणसाने ठेवायला हवी. महागडे शिक्षण सगळ्यांनाच परवणारे नाही.आज ही आपण दारिद्र्याच्या उन्हात तळपतच आहोत.असे असताना गरिबांचे शिक्षण बंद झाले तर मग विकास नेमका कोणाचा होणार आहे हे तुम्हीच समजून घ्या.चारचाकी वाहन,घर यासाठी कर्ज घेतलेल्या मध्यम वर्गीयांचं जीवन कर्जाचे हफ्ते फेडण्यात कधी संपतं हे त्याचं त्यालाच कळतं.तिथं हातावर पोट असणाऱ्या मजुरांना खाजगी वाहतूक व्यवस्था,
महागडे खाजगी उपचार,महागडे खाजगी शिक्षण थोडे तरी परवडणार आहे का ? याचा आत्ताच विचार करायला हवा.या स्वतंत्र देशात स्वातंत्र्याचा गैर फायदा बऱ्याच वेळा घेतला जातो असं म्हणतात. तरी ही सुविधा फक्त गर्भ श्रीमंत लोकांसाठीच आहे असे मला वाटते.नाहीतर आज ही बहुतांश लोक विवंचनेतच जगत असतात. म्हणून तर आनंदी देशाच्या यादीत आपण खूप मागे आहोत.सत्तेची चावी ज्याच्या हाती तोच खरा भाग्यवंत.असे चित्र आता आपल्याला दिसते. खाजगीकरणाचा राक्षस हळूहळू आपल्या भोवती फास आवळतोय. पण सामान्य माणूस अजुन ही झोपेत आहे.जेव्हा त्याची झोप उडेल तेव्हा मात्र सगळं काही त्याच्या हातून गेलेलं असेल.मला त्याचं काय ही प्रवृत्ती खूपच घातक ठरणार आहे. एखादा छोटासा असणारा आजार आपण खूप हलक्यात घेतला तर नंतर त्याचा गंभीर असा आजार होतो आणि तो जगणे मुश्किल करतो. तसेच खाजगीकरणाच्या बाबतीतही आहे. हा मुद्दा राजकारणाचा नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनामरणाशी संबंधित आहे सत्ताधारी काय आणि विरोधक काय आता सगळे एकच झालेले असतात. म्हणूनच असं म्हणतात कि माणसाची अशी एक हक्काची जागा असावी जिथून त्याला सहजासहजी कोणी दूर ढकलू शकणार नाही. सरकारी सेवा पुरवणारी ठिकाणे या अशाच सर्वसामान्य माणसाच्या हक्काच्या जागा आहेत. आजच्या या छोट्या संकटाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कारण असे केले तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत.पुन्हा भांडवलशाहीचा उदय हा विनाशास कारणीभूत होऊ शकतो.यांचे एक उदाहरण सांगतो एका गावात सरकारी गिरणी होती त्यात 2 रुपये किलो प्रमाणे दळण दळून गावातील लोकांना मिळत असे, पण गावात एका सावकाराने खाजगी गिरणी टाकली त्याने 1 रुपया किलो प्रमाणे दळण दळून द्यायला सुरु केले, सगळे लोक नव्या गिरणीत दळण दळण्यासाठी गेले. पर्यायाने सरकारी गिरणीला परवडत नसल्याने ती आपोआप बंद पडली. आणि खाजगी गिरणी मालकाने दळण दळण्याचा भाव चार रुपये किलो म्हणजे दुपट्ट केला. अश्या रीतीने सरकारी गिरणीची वाताहत झाल्याने खाजगी गिरणी मालकाने लोकांची पिळवणूक करायला सुरुवात केली. गरिबांचे जिने मुश्किल केले. आताच आपण खाजगी करणाचा धोका ओळखला नाही, तर भौतिक सुविधाच्या गोंडस नावाखाली सरकारी शाळा पुढे लावायचे कंपनीचे नाव, लवकरच शाळेच्या नाव बदलून कंपनीचे नाव येईल. एका ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केल्याचा इतिहास कधी विसरू नका नाहीतर येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत......
********************
Comments
Post a Comment