घराचे दार
🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪
* घराचं दार *
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।*
*आई बाबा नाव तयाचे समजदार।धृ।*
*दाराला आस्थेचे महिरपी तोरण*
*जणू आदरतिथ्याचे प्रेमळ किरण*
*एकमेव विसाव्याचे स्थान उबदार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।१।*
*दारिद्र्याच्या दशवतारात न मोडणारे*
*कोत्या विचाराच्या वाळवीने न सडणारे*
*ऐश्वर्याच्या उन्मदात कधी न फुगणार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।२।*
*नातवंडांच्या आगमनाला नेते तुकडापाणी।*
*करी लेकीची पाठवणी साश्रू नयनांनी।*
*व्यसनी पावलांना आणत ताळ्यावार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।३।*
*ऊन पावसाचा मारा हे सोसत असतं*
*वाईट नजरांना सतत झेलत असतं*
*आदरयुक्त नजरेने उभं असतं धाकदार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।४।*
*बाहेर जाताना आशिर्वाद हे देतं*
*उशीर झाला तर जाब पण विचारतं*
*साऱ्या कुटुंबाचं असतं हे राखणदार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।५।*
*तकलादू वाटलं तरी आडोसा असतं*
*चांगल्या-वाईटाच कानोसा घेत असतं*
*अडाणी असलं तरी करत मूल्यांच संस्कार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।६।*
*आयुष्यात नेहमी जपा या कवाडाला*
*स्वार्थाचे खिळे ठोकू नका या दाराला*
*साऱ्या सुख-दुःखाच आहे हे साक्षीदार*
*घराला असतं एक वाट पाहणारं दार।७।*
*जपू या आपण आई-बाबा या कवाडाला।*
*नमन माझे सदा या स्वर्गाच्या प्रवेशद्वाराला।*
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अहमदनगर
🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪🚪
Comments
Post a Comment