आम्ही फ्रिज विकतो
आम्ही फ्रिज विकतो
आमच्या कडे फ्रिज आहे हे , आलेल्या पाहुण्याला कळावे म्हणून मुद्दामून आम्ही त्याला, फ्रिजचं थंड पाणी चालते ना तुम्हाला असं ठासून विचारत असू.
उन्हाळ्याचे दिवस होते. त्या मुळे आजूबाजूचे शेजारी सर्रास गार पाणी वगैरे मागायला येत.
एकदा, माझे साहेब, त्यांची बायको आणि दोन मुलं घरी येणार असल्याचा फोन मी बायकोला केला.
साहेब घरी येताहेत, फ्रिज बीज पुसून ठेव. घर पण आवरून ठेव.
ती म्हणाली, की त्या दिवशी तिची भिशी आहे. त्या मुळे थोडावेळ तुम्ही गप्पा मारत बसा. मी येतेच.
संध्याकाळी आम्ही घरी आलो तर सांगितल्या प्रमाणे बायको घरी नव्हती. आम्ही गप्पा मारत तिची वाट पाहात बसलो होतो. त्यांना पाणी द्यायसाठी मी फ्रिज उघडलं आणि बघितलं तर आत मध्ये फॅमिली पॅक आईसक्रीम चा एक बॉक्स डीप फ्रिज मध्ये ठेवलेला होता. मला बायकोच्या समजूतदार पणाचा खूप अभिमान वाटला.
म्हटलं, साहेब, बायको येई पर्यंत आपण आईसक्रीम खाऊ या का. आईसक्रीम म्हटल्यावर त्यांची मुलं तर जाम खूषच झाली. त्यांची बायको म्हणाली, तुम्ही बसा बोलत मी घेऊन येते. तुमचं घर काय परकं थोडंच आहे मला. ती आत गेल्यावर त्यांची दोन्ही मुलं आत पळाली. बाईंनी आईस्क्रीम वाटायला घेई पर्यंत मुलांना चॉकलेटचे दोन बॉक्स सापडले. दोघ त्यावर तुटून पडली. कदाचीत प्रमोशन च्या खुशीत बायकोने आणलं असेल असं मला वाटलं आणि म्हटलं, तुम्हाला चॉकलेट आवडत ना म्हणूनच आणलं आहे. मनसोक्त खा. पोरांनी धडाधड चॉकलेट खाऊन संपवली. तोपर्यंत मॅडमने मोठं मोठ्या वाट्यांमध्ये आईस्क्रीम आणलं. आम्ही मोठ्या चवीने आईस्क्रीम खात होतो. बायकोची आणि माझ्या आदरातिथ्याचं साहेब खूप कौतुक करत होते.
मी त्यांना आग्रह करून करून अजून एक एक वाटी आईस्क्रीम घ्यायला लावलं. आम्ही ते खात असतांनाच, शेजारच्या काकू डोकावून गेल्या. मी विचारलं काय हवयं. तर म्हणाल्या फ्रिज मध्ये सामान ठेवलं आहे पाहिजे होतं. मी आपुलकीने म्हटलं, अहो, जा ना आत काकू, घ्या ना तुमच्याच हाताने.
काकू आत गेल्या.
बघ हा असतो, चाळ आणि ब्लॉक मधल्या लोकांचा फरक. खरं प्रेम आपुलकी अनुभवायची असेल ना, तर चाळीतच घर हवं. नाहीतर ब्लॉक मध्ये कुणी मेलं तरी एकमेकांकडे ढुंकून बघत नाहीत.
हो साहेब, तसे आमचे सगळे शेजारी खरंच खूप चांगले आहेत. असं आमचं कौतुक सुरु असतांनाच काकू हॉल मध्ये आल्या आणि कमरेवर हात ठेवून टीपॉय वरच्या वाट्यांकडे संशयाने पाहात म्हणाल्या, अहो तुमच्या फ्रिज मध्ये मी आईस्क्रीमचा बॉक्स ठेवला होता. दिसतं नाहीये कुठे.
त्यांच बोलणं ऐकल्याबरोबर आम्हाला तर काय बोलावे तेच सुचेना. तरी मी अतिशय नम्रपणे त्यांना म्हटलं काकू जरा गडबड झाली. तुमचं आईस्क्रीम आमच्या कडून चुकून खाल्लं गेलं. मी लगेच तुम्हाला आणून देईन.
आईस्क्रीम खाल्लं म्हटलं म्हटल्या बरोबर काकूंचा पारा एकदम चढलाच. पण दुसऱ्यांच्या वस्तू न विचारता खाण्याची तुम्हाला हिम्मतच कशी होते. एव्हढं आईस्क्रीम खाऊ घालायचं होतं तर स्वतः विकत आणायचं होतं ना. आता मी घरी काय सांगू. काकूंचा आवाज एव्हढा मोठा झाला होता की आमच्या घरासमोर बरीच गर्दी जमा झाली आणि काकू आमच्याशी बोलायच्या ऐवजी त्या लोकांनाच आम्ही त्यांच आईस्क्रीम कसं खाऊन मारलं, हे तावातावाने सांगायला लागल्या.
आम्ही तर वाचा गेल्या सारखे गप्पच होऊन गेलो होतो. तेव्हढ्यात कोपऱ्यावरच्या घरातल्या दुसऱ्या काकू आमच्या घरात घुसल्या आणि म्हणाल्या, बाई ग, निदान आमची चॉकलेट तरी आहेत का बघून घेते. असं म्हणतं त्या आत गेल्या आणि सर्वस्व लुटलं जावं इतक्या जोरात किंचाळल्या, अरे देवा, आमची चॉकलेट पण संपवली वाटतं या लोकांनी.
मग काय विचारता. आमच्यात माणुसकी कशी नाही. दीड दमडीचा काय तो फ्रिज घेतला तर आकाशाला कसे हात पोहोचले आहे आमचे या वर आम्ही तिथं नसल्या सारखं समजून जोरजोरात चर्चा सुरु झाल्या. तेव्हढ्यात बायको भिशी वरून परत आली. तिने एवढी गर्दी दारात जमा पाहून विचारलं काय झालं, आणि हा भांडणाचा गदारोळ सुरु झाला.
बराच वेळ एव्हढा धुमाकूळ सुरु होता की त्या गोंधळात साहेब केंव्हा निघून गेले मला कळलंच नाही.
पण मी म्हणते, खाण्यासाठी एव्हढी मर मर करावीच कशाला.थोडावेळ वाट पाहिली असती तर काही बिघडलं नसतं. मी काय कायमची मेले नव्हते तिथे.
त्या नंतर चाळीतल्या लोकांनी आमच्याशी बोलणं पूर्ण बंद केलेलं आहे. बायको फ्रिजचा उल्लेख मढ असा करते.बराच विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं आहे की आता येईल त्या किमतीला फ्रिज विकून टाकायचं. कोणाला हवं असल्यास नक्की संपर्क करा.
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे जि. प. प्रा शाळा कळस ता. पारनेर जि. अहिल्यानगर
Comments
Post a Comment