कांदे विकल्यावर बघू

"#कांदे विकले की बघू..."

या एका वाक्यात कितीतरी स्वप्नं दाटलेली असतात. पोराचं सायकलच स्वप्न, लेकीच्या लग्नाचं सुखी भविष्य, बायकोच्या मळक्या पदरातलं नव्या साडीचं स्वप्न आणि शेतमालाच्या किमतीवर आधारलेलं शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य!
माणसासारखं जगावं म्हणून शेतकरी रोज उन्हातान्हात राबतो. पाऊस आला की पाणी भरतो, नाही आला तर आसवांनी रान पिकवतो. रानावरचा माल तसा छान तयार होतो, पण बाजारात पोहोचल्यावर तोच माल मातीमोल विकतो. पोराच्या सायकलचं स्वप्न दूर होतं, लेकीचं शिक्षण अर्धवट राहतं, बायकोचं सौभाग्याचं लेणं सावकाराच्या गहानखात सडतं, आणि बापाच्या डोळ्यांतलं जगण्याचं स्वप्न मात्र त्या कांद्याच्या ढिगाऱ्यात पुरलं जातं.
"कांदे विकले की बघू" म्हणतच बाप रोज माघारी फिरतो, पण लेकरं त्याच्या ओस पडलेल्या चेहऱ्यातलं दुःख ओळखून त्याच्या स्वप्नांना हळूहळू मागे सारतात. बाप फाटक्या बनियनवर समाधान मानतो, लेकरं जुने पुस्तकं उघडून आपले नवे भविष्य शोधतात, आणि बायको गळ्यातला हुंदका गिळून पुढच्या हंगामाची तयारी करत राहते.
पण...
आम्ही शेतकरी असतो म्हणून आमचं स्वप्नं विझत नाहीत. कधी तरी चांगला हंगाम येईल, कधी तरी बाजार भाव वाढेल, कधी तरी न्याय मिळेल, आणि त्या दिवशी "कांदे विकले की बघू" म्हणताना स्वप्नं प्रत्यक्षात आणू, हे आम्ही मनाशी पक्कं ठरवलेलं असतं. कारण आम्ही मातीतून उगवतो, मातीतून पुन्हा जगतो, आणि कष्टाच्या घामावर आयुष्य फुलवायची जिद्द आम्ही कधीही सोडत नाही.
तोवर, "कांदे विकले की बघू" हे वाक्य आमच्या जगण्याचं प्रतीक राहील – संघर्षाचं, कष्टाचं, आणि आयुष्यभरासाठी अढळलेल्या आशेचं!
शेवटी आशा सोडायची नाही....
कांदे विकल्यावर बघू...♥️

-

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ