शिकार

*शिकार* 

     परवा एक चित्र पाहण्यात आलं. एका चित्त्यानं एका माकडीणीची केलेली शिकार आणि तरीही तिच्या पोटाला बिलगून बसलेलं तिचं लेकरू तेही जिवंत......
     शिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली निष्प्राण माकडीण. नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी.  त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक, की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि  तितक्याच अनामिक भावनेनं ते आईला बिलगून बसलं आहे. त्याला माहीत पण नसेल पुढचा नंबर आपला आहे. 
     त्या आईचं हृदय किती हेलावून गेलं असेल. तीला तिच्या मृत्यूची पर्वा नसेलही कदाचीत, पण तिच्या पोटाशी बिलगून बसलेल्या तिच्या लेकराबद्दल तीला किती असंख्य वेदना झाल्या असतील. मरताना शेवटच्या क्षणाला ही तीला हेच वाटत असनार माझं पिल्लू कसं असेल, ते सुटेल का त्याच्या तावडीतून. शेवटी आईचं हृदयच ते, तीला बोलता येत नाही. तिच्या वेदना तिचा आक्रोश आपल्याला कसा कळणार. त्या पिलाला अजुनही वाटत असेल आपल्या आइसोबत आपण सुरक्षितच आहोत. आई आपल्या सोबत आहे ती सगळ्या संकटातून मला सोडवेल.
     मनाला असंख्य सुया टोचाव्या असा हा हृदयद्रावक प्रसंग. असा कोणीही नसेल की ज्याचं, हा प्रसंग पाहुन हृदय पाझरणार नाही. आणि पापण्या आपोआप ओल्या झाल्याशिवाय रहाणार नाहीत. इथं एकाचं मरण हे दुसर्याचं जीवन असतं. आणि प्रत्येक जण इथं धावतोय. फरक इतकाच आहे, एक जीव वाचवण्यासाठी धावतोय तर दुसरा अन्न मिळवण्यासाठी. 
     शेवटी निसर्गच तो.  तटस्थ. त्याला काय कुणाचं देणं घेणं नाही. अव्याहत पणे पुढ सरकायचं एव्हडच काय ते त्याला माहीत. शिकार होणारा आणि शिकार करणारा दोघेही त्याचेच. पालन करणारा आणि उध्वस्त करणारा ही तोच. जन्माला घालुन शेवटी मातीत घालणारा तोच. मातीही त्याच्यापासून कुठे वेगळी आहे. मातीही त्याचीच. त्याच्यापासून काय वेगळं काढायचं त्याचंच सगळं. शिकार होणार्याचं दुख मानायचं की ज्याला जगायला अन्न मिळालं त्याचा आनंद मानायचा. किती भावनांची उलथापालथ. महत्वाचं म्हणजे आपलं मन , बुद्धी आणि विचार करण्याची ताकत ही त्यानंच आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी. त्याच्या लेखी गरिब - श्रीमंत, उच - निच, लहान - मोठा, जात - पात वगैरे असं काहीच नाही. आपण मात्र आपल्याला मिळालेल्या अमुल्य देणगीनं तयार केलेल्या या सगळ्या मोठाल्या फक्त पोलादी भिंती. ज्या आपल्याला एकमेकांपासून आणि निसर्गापासून दूर घेवुन जाणार्या अंधार कोठड्या आहेत. 
     वेगवेगळ्या अंगाने , दृष्ठीने पाहिले तरी हा प्रसंग नक्कीच अंतर्मुख करायला लावणारा आहे. जीवन संघर्षाचे विविध पैलू उलघडून दाखवणारा. आयुष्याची क्षणभंगुरता दाखवणारा. काय आहे मग आपल्या हातात. उन्मादात जागायचय का नम्रतेने वागायचंय. सगळंच ओरबाडून घ्यायचंय का पुढच्या पिढीसाठी काही ठेवायचंय. नदीसारखं निखळपणे वहात रहायचंय की डबकं बनून सडत रहायचंय. शेवटी बुद्धी आणि विचार ही त्या निसर्गानच आपल्याला दिलेली देणगी.

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ