देव आणि माणूस

*देव आणि माणूस* *                           देव आहे असे मानतो तो आस्तिक , देव नाही असे मानतो तो नास्तिक ! नास्तिकच खरा आस्तिक असतो असे मानणाराही एक प्रवाह आहे. नास्तिकच खऱ्या अर्थाने देवाचा शोध घेत असतो, आस्तिक देवाचा शोध घेत नाही, तो मानून चालतो. देव ही केवळ श्रध्देची किंवा मानण्याची गोष्ट नाही. देव ही जाणण्याची -शोधण्याची गोष्ट आहे. देवाचा शोध घेण्यासाठीच विवेकानंद रामकृष्णांकडे गेले. कालिमाता तुम्हाला दर्शन देते तसे दर्शन मला घडवा म्हटले. घरचं दारिद्र्य दूर करण्यासाठी  मला तिच्याकडून धन मागून घ्यायचे आहे. प्रत्यक्षात गुरुंनी कालिमातेचं दर्शन घडवलं तेव्हा धन मागायचं विसरूनच गेले. माते मला ज्ञान, विवेक , वैराग्य दे म्हटले. तुकोबाही म्हटलेत, 'देव पाहावयासी गेलो देवचि होवोनी ठेलो। ' देव भेटला की माणूस देवच होतो. दैवी संपदाच मागतो. मध्ये वाटेतच पूजारी भेटला की, देवाची भेट राहूनच जाते. मग आपण पूजापाठ,मंत्रतंत्र,जपजाप्य, होमहवन, व्रतवैकल्य, विधीउपाधी यातच अडकून जातो. ओशो म्हणतात,' पूजा सौदा है , भक्ती नही। क्या पूजारी की थाली भरने से भगवान खूश हो जाता है? ' गाडगेबाबा साध्या वऱ्हाडी बोलीत सांगतात, 'अरे देव का देवळात राह्यते, देवळात राह्यते पुजाऱ्याचे पोट! '                      कोणत्याही देवळात जा, बाहेर देणगीदारांची मोठी पाटी लावलेली दिसते. जणू काही यांच्या देणगीवरच देव देवळात बसलेलाहे! चंदशेखर गोखलेंची छान चारोळीहे -" देवळात जाऊन माणसे दुकानात गेल्यासारखी वागतात चार आठ आणे टाकून काहीतरी मागतात." आपण देव शोधायला देवळात जातो ; की आपल्या इच्छा- आकांक्षाच्या पूर्तीसाठी , आपल्या अडचणी सांगण्यासाठी देवळात जातो? देवळातून बाहेर येतांना देवळाच्या दारातल्या भिकाऱ्याच्या ताटलीत दोनपाच रुपये आपण टाकतो, तेवढ्यानेही तो बिचारा खूश होतो. .... खरंतर आपण मात्र त्याच्यापेक्षाही मोठे भिकारी असतो. छान चाललंय, दिलंय तेही इतरांपेक्षा बरंच जास्त आहे, त्याबद्दल धन्यवाद ! कृतज्ञ आहे मी तुझा ! आता आणखी काही नको, फक्त तुझे आशीर्वाद असूदेत! अशी कृतज्ञता व्यक्त केली तर देवही प्रसन्न होईल.               हिंदुंचा देव निळासावळा हातात बासरी घेतलेला, मुस्लिमांचा मूर्तीत -प्रतिमेत नाहीच! ख्रिश्चनांचा सूळावर चढलेला तर बौद्धांचा ध्यानात मग्न! शोधावा तरी कुठं? नि कसा? आपल्याच मनाचे रंग थोपवलेत आपण त्याच्यावर! सारखे तक्रारी सांगणारे किरकिरे भक्त आणि सारखे काहीबाही मागणारे वखवखे भक्त देवाला कसे आवडतील ? अहो, परमात्मा कंजूष नाही, तो अपात्र लोकांना पण बरंच काही देतो. आपण फ्रीज , टीव्ही , हिरेमाणकं अशा बऱ्याच मौल्यवान वस्तू घरात आणतो.  कल्पना करा, घरात दुनियेतल्या सगळ्या महागड्या व मौल्यवान वस्तू आहेत पण घरात हवाच नाही. आपण जगू का? म्हणजे घरातली सगळ्यांत मौल्यवान चीज आहे हवा. अन्न, वस्त्र, हवा, पैसा,पाणी, निवारा असं बरंच काही मौल्यवान त्याने आपल्याला बहाल केलेलं असतं. पण आपल्या वृत्तीतली 'जन्मजात ' गरिबी काही हटत नाही. पृथ्वी नावावर करून दिली तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात जाऊन    ' आता मंगळावर फक्त एक गुंठा दे ! ' अशी मागणी करायला आपण अजिबात कचरणार नाही. वासनांच्या जंजाळात माणूस स्वतःला असा सारखा मारत राहतो.या अवस्थेचं एका कवीने फार मस्त वर्णन केलंय-    " कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी ।                  जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी । "                                  त्यामुळंच वास्तवाला पाठ दाखविण्याचा बेगडी संभावितपणा धोकादायक आहे. आणखी एक छोटीशी गोष्ट - एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावर उभा असणारा इंजिनीअर खाली जमिनीवर  काम करणाऱ्या मजुराला काही सांगू पाहतो, पण  त्याचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचत नाही. मग तो एक रुपयाचं नाणं टाकतो. तो मजुर ते घेतो खिशात ठेवतो नि वर न बघता आपलं काम करत राहतो. इंजिनीअर पुन्हा दुसरं टाकतो, पाचचं टाकतो, दहाचं टाकतो. मजूर घेतो नि खिशात ठेवून देतो. मग तो एक खडा टाकतो. मजूर लगेच वरती बघतो.तात्पर्यः देव सर्व सुखे देतो त्यावेळी माणसाचे लक्ष त्याच्याकडे जात नाही ... पण संकटाचा एखादा खडा टाकतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीची प्रार्थना सुरू होते. मनस्वी प्रार्थना करावी. आर्ततेनं आरती करावी. उगीच भिकाऱ्यासारखं सतत मागत राहू नये. जगातली सर्वात सुंदर प्रार्थना असते खेड्यातल्या अडाणी  शेतकरी माणसांची -' देवा बास आणिक काही नको, फक्त कष्टाला हायती असू दे! घंटा बडवण्यापेक्षा स्वतःला घडवणं महत्त्वाचं! देव सर्वांचं भलं करो !                             

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ