ऋ्तूंची भविष्यवाणी
ऋ्तूंची भविष्यवाणी.*
पाऊस आता ठरलेल्या ऋतूतच येत नाही.
हिवाळ्याच्या अंगणात तो गडगडाट करत येतो,
उन्हाळ्याच्या दुपारी तो पानगळलेल्या झाडांना भिजवतो.
जिथे सूर्य तळपायचा, तिथे काळे ढग मुक्काम ठोकतात,
आणि जिथे थंडीचा शिरशिरा असावा,
तिथे उकाड्याची जाळ घुसमटवते.
ऋतुंचं हे विस्कळीत नृत्य फक्त बदल नाही,
तर एक इशारा आहे...
मानवाच्या अधर्माला,
त्याच्या अतिरेकी लोभाला
निसर्गाचे थेट प्रत्युत्तर.
जगातील प्रत्येक ऋतु बदल हा एक घंटानाद असतो.
आगामी काळाच्या दारावर वाजणारा इशारा.
कधी मंद, कधी गडगडाटी,
पण कायम सतर्क करणारा.
आजचा पाऊस जणू सांगतोय...
"मी वेळेच्या चौकटीत नाही,
कारण तुम्हीच काळाचा तोल ढवळलात.
तुम्ही ऋतुंचं संतुलन बिघडवलं,
आणि आता माझं आगमन हे
तुमच्या भवितव्याची पहिली घोषणा आहे.
आकाशात ढग आहेत, पण त्यांचा चेहरा ऋतुसंगतीचा नाही.
वार्याचा स्पर्श थंडावा द्यायचा, तोच आता चटका लावतो.
फुलं उमलतात, पण त्यांचा सुगंध हरवलेला.
निसर्गाच्या वीणेवरची प्रत्येक तार जणू विस्कटली आहे.
कधी शरदात वाजते पावसाची गाणी,
कधी पावसाळ्यात दाहक उन्हाची ज्वाला.
ही लय निसर्गाने नाही मोडली,
ही आपणच मोडली आहे.
माणसाच्या अनिर्बंध इच्छांनी पृथ्वीची छाती कुरतडली.
वृक्षांच्या स्मशानभूमीतून उठलेले धुराडे
आकाश झाकून टाकू लागले.
समुद्राच्या लाटा रुसून उसळतात,
पर्वतांच्या कड्यांत अस्वस्थतेची चर्रक भरली आहे.
ऋतुंचा हा विस्कळीत पणा
केवळ ऋतुचक्र नाही.
तो आहे पृथ्वीच्या संतापाचा आरंभ.
एक आक्रोश,
जो मानवजातीला चेतवतोय.
"तुमच्या लोभाच्या रानटी ज्योती
आता स्वतःलाच भस्म करतील."
पूर्वी ऋतु म्हणजे निसर्गाचा ताल होता.
शरदाचा स्वच्छ निळा आकाश,
पावसाळ्याचा गंधाळलेला वारा,
हिवाळ्याची धुंद शुभ्र धुके,आणि उन्हाळ्याची तडफदार ज्वाला .
हे सगळं ठराविक क्रमाने यायचं.
जणू निसर्गाची शिस्तबद्ध आरतीच.
पण आता तो क्रम हरवलाय.
हिवाळ्यात पावसाने धूमाकूळ घालणं,
उन्हाळ्यात थंडी वाजणं,
पावसाळ्यात सूर्याचा कोप पहाणं ..
हा क्रम मानवाच्या अधर्माचा पुरावा आहे.
जेव्हा जेव्हा ऋतु ठरलेला मार्ग सोडतो,
तेव्हा तो फक्त बदल नसतो,
तो एका नव्या युगाची पहिली घंटा असतो.
अराजकतेची सुरुवात.
कारण निसर्ग कधीही गोंधळ घालत नाही,
तो फक्त प्रत्युत्तर देतो.
हे प्रत्युत्तर म्हणजे भविष्यवाणी.
झाडांच्या वाळलेल्या पानांत,
पावसाच्या विस्कळीत थेंबांत,
सागराच्या रुसलेल्या लाटांत.
भविष्य सांगणारं अक्षर उमटलेलं आहे.
ते अक्षर सांगतं ...
"मानवा, तू ऋतुंचं गाणं फोडलंस.
आता त्याची किंमत तुला भरावी लागेल."
ऋतुंचा हा बंडखोर नाद
आपल्याला सावध करत राहील,
जोपर्यंत आपण पुन्हा
निसर्गाच्या तालात जगायला शिकत नाही.
ऋतुंची भविष्यवाणी म्हणजे
एखाद्या ऋषीची वाणी नाही,
तर पृथ्वीच्या छातीचा आर्त निनाद आहे.
तो निनाद अजून मंद आहे,
पण उद्या तो वादळ बनेल…
Comments
Post a Comment