माणुसकी
# शुभ सकाळ....!🌞🧑🌾🌹
➖▪️➖▪️➖▪️➖▪️➖
माणूस जेंव्हा जन्माला येतो तेव्हा सोबत कोणतीही जात नसते, धर्म नसतो....प्रत्येक जण एकाच रंगाचं रक्त घेऊन जन्माला येतो. कुणी लहान नाही. कुणी मोठा नाही. पण जसजसा तो मोठा होऊ लागतो , तसतसा एक मुखवटा चेहऱ्यावर चढत राहतो . एका साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात! एवढं सुंदर जीवन हातात असताना खोट्या भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते. माणूस धावत राहतो. टॉलस्टॉयच्या कथेसारखे ! सूर्यास्तापर्यंत जेवढी जमीन पायाखाली येईल, तेवढ्या जमिनीच्या मालकीसाठी अथक धावत रहायचं. अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही.
जीव गुदमरून टाकणाऱ्या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठं हातात असतात! काळ मोठा कठोर असतो! मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या दौडीत एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.
आपलं खरं जीवन कायम दुर्लक्षित राहतं अडगळीच्या खोलीसारखं. वेळ येईल तेव्हा वापरून घेऊ म्हणून जपून ठेवलेल्या सामानासारखं आयुष्य होऊन जातं. निर्जीव, निष्प्राण! कधीतरी सुखी होऊ, आनंदाचं गाणं गाऊ या भ्रमात 'वर्तमान' कणाकणानं निसटतो, बंद मुठीतून... वाळूसारखा. अपार अथांग सुखाचा किनारा डोळ्यांना दिसत नाही. उत्सव कधी साजराच होत नाही आयुष्याचा. आणि आयुष्याला सीमा आहेत. शाश्वत नाही ते. अखेर आसक्तीचे गाठोडे इथेच ठेवावे लागते किनाऱ्यावर.
''सोन्याचे आयुष्य विकोनी,
महल उभे दगडांचे केले
कळते जेव्हा मोल जिण्याचे,
तेव्हा नसतो क्षणही हाती
मृगजळास या जन्म हारलो,
खंत एवढी उरते बाकी!''
आयुष्याच्या जात्यावर दिन-रात दळत रहायचे, पण भरडलं जाताना निखळ आनंद अंत:करणात का गळत नाही, हा खरा प्रश्न आहे.
हा गुंता उकलता आला तर किती विलोभनीय आहे जीवन! सजगतेनं जगता आलं तर सुखाचा स्वर्ग मनातच उभारता येतो आणि हेच मानवी जीवनाचं उत्तर आहे. माणसाचं समृद्ध जगणं आणि आयुष्य सार्थकी लागणं याहून वेगळं काय असतं?
................ 👏🏻................
Comments
Post a Comment