कृत्रिम बुद्धिमत्ता

*कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक क्षेत्रावर होणारा परिणाम*
-डाॅ. माधव सूर्यवंशी.

 माणूस शिकत गेला, त्या प्रमाणात त्याचे जीवन उत्क्रांत होत गेले. माणसाची शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच त्याचे शिक्षण होय.शिक्षण क्षेत्रातील बदलाचा त्याच्या जीवनावर परिणाम झाला. त्या बदलाच्या इतिहासाचा आपण विचार करतो, त्यावेळेस प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा प्रभाव असल्याचे जाणवते. छपाई यंत्र, वीज, संगणक, इंटरनेट याच्या शोधामुळे शिक्षणातील बदलाची गती अधिक वाढल्याचे लक्षात येते. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence-AI) याची जगभर चर्चा सुरू आहे. शिक्षण ही समाजाची मूलभूत गरज आहे, या शैक्षणिक क्षेत्रावर ए. आय.चा होणारा परिणाम खूप व्यापक स्वरूपाचा आहे. आज शिक्षण क्षेत्रातील प्रमुख घटक असणारे विद्यार्थी,पालक, शिक्षक, प्रशासक आणि धोरणकर्ते या सर्वांवर ए.आय. चा प्रभाव असल्याचे दिसून येते. ऑनलाइन वर्ग,वैयक्तिक मार्गदर्शन,  मूल्यांकन,भाषांतर साधने, प्रयोगशाळा, शैक्षणिक डेटा विश्लेषण या सर्व माध्यमातून ए.आय. चा सुरू असलेला वापर आपल्या लक्षात येतो.
 
*कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?*
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी मेंदूप्रमाणे विचार करणे,शिकणे, निर्णय घेणे आणि समस्यांचे निराकरण करणे याची क्षमता होय. उपलब्ध माहितीवरून निर्णय घेणे, परिस्थितीनुसार योग्य तो पर्याय निवडणे, गुंतागुंतीच्या प्रश्नाचे डेटा नुसार विश्लेषण करून, निराकरण करणे, स्वतःच्या अनुभवावरून स्वतःच शिकण्याचा प्रयत्न करणे आदी. कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील. कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी बुद्धिमत्ता यांच्यातील फरक सहजपणे आपल्या लक्षात येतो. मानवी बुद्धिमत्ता ही जन्मजात, नैसर्गिकरीत्या मानवाला मिळते. त्यात भावना आणि संवेदना प्रकट करता येतात, ती अधिक सर्जनशील (Creativity)असते. कला, साहित्य यातील नव्या कल्पनाचा शोध घेण्याची व निर्माण करण्याची क्षमता ही मानवी बुद्धीमत्तेमध्ये ओतप्रोत भरलेली असते. यामुळे दोन्ही बुद्धिमत्तेत मूलभूत फरक आहे.

*कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणात होणारा उपयोग*
 गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रक्रिया गतीने घडवून आणण्यासाठी शिक्षणात मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग होत आहे. अध्ययन आणि अध्यापन ही अंतरक्रिया अधिक सक्षम होण्यासाठी ए.आय.चा वापर अधिक प्रमाणात होताना आज जाणवतो आहे. 

1) शिक्षक सहाय्यक-
 शिक्षकांना मदत करणारे साधन म्हणून ए.आय.चा वापर शिक्षणात होत आहे. ए.आय.चॅट बॉक्सचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शंकांना त्वरीत उत्तर देता येते. शिक्षकांना गृहपाठ तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, अभ्यासक्रमाचे नियोजन करताना ए.आय. ची मदत होते.

 2) 'स्व'शिक्षण (self Learning)-
 विद्यार्थी स्वतः स्वतःचे शिक्षण घेत असताना,  ए.आय.चा वापर करतात. प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या गतीने, आवडीने शिक्षण घेऊ शकतो. उदा. सध्या भाषा संवाद शिकवणारे ॲप्स, विविध खाजगी शिकवण्याचे ॲप्स. 

 3) मूल्यांकन-
विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना ए.आय. प्रणालीचा वापर नवीन शैक्षणिक धोरणाने स्वीकारला आहे. यानुसार स्वयंचलित मूल्यांकन यात वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQ, True/False), शिकत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागवा घेणे, चुका दाखवणे व सुधारणा सुचवणे आदी.

4) भाषाशिक्षणात ए.आय.- 
 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण घेत असताना, जागतिक पातळीवरील विविध भाषा ए.आय. आधारित अनुवादित साधने उदा.गुगल भाषांतर,मायक्रोसॉफ्ट भाषांतर.मातृभाषेतून वैश्विक भाषांना नेऊन जोडतात.

5) प्रत्यक्ष अनुभूती-
 ए.आय. सोबत VR/AR वापरून विद्यार्थी प्रयोगशाळेत न जाता विज्ञान प्रयोग, इतिहासातील घटना किंवा भूगोलाचा अभ्यास याची प्रत्यक्ष अनुभूतीने घेऊ शकतात. 

6) शैक्षणिक धोरण व डेटा विश्लेषण-
 ए.आय. चा  प्रचंड वेग आणि डेटा जमा करून ठेवण्याची क्षमता यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा वेग तपासून पहाता येतो. तो कोठे आहे? कुठे माझे पडतो? त्याचे अचूक विश्लेषण करता येते.यामुळे त्या विद्यार्थ्याची  प्रगती घडवून आणण्यास मदत मिळते. हा डेटा शाळा व सरकार यांना शिक्षणविषयक धोरण आखताना उपयोगात आणता येतो.

7) संकल्पनाचे सुलभीकरण-
 गणित, विज्ञान या विषयातील अनेक संकल्पना या गुंतागुंतीच्या असतात. या संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगणे अवघड जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे त्याचे सुलभीकरण करणे सोपे झाले आहे. ए.आय.वर आधारित ॲनिमेशन, थ्रीडी सिम्युलेशन, विविध मॉडेल्स यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना एखादा विषय विशेष स्पष्ट करून सांगणे.  विद्यार्थ्यांना समजेल अशा पध्दतीने, सोबतच त्याचे रंजन होईल अशा पद्धतीने या संकल्पना समजून सांगण्यास याची मदत होते. उदाहरणार्थ मानवी शरीराची रचना थ्रीडी स्वरूपात दाखवली गेल्यास जीवशास्त्रीय संकल्पना लवकर समजतात.

8) शिकण्याच्या समानसंधी-
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशी विद्यार्थ्यांमधील दरी कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्याचे शालेय समावेशन होईल.यासाठी शालेय प्रशासनाने व शासनाने आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविल्या पाहिजेत.ए.आय. शिक्षणासाठी आवश्यक असणारा वीजपुरवठा, संगणक, इंटरनेट आदी.
इंटरनेटच्या साह्याने आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अनुभव घेतील. ए.आय. आधारित साधने वापरून त्यांच्या शिक्षणामध्ये खूप मोठा सकारात्मक, गुणात्मक बदल करता येईल.

 9)उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्राला गती-
तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगाचे रूपांतर एका गावात झाले आहे. माऊसच्या एका क्लिकवर माहितीचा मोठा स्त्रोत सहजपणे आपल्या नजरेसमोर येतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्राला  लागणारे ज्ञान व माहिती याचा अचूक संदर्भ कमीत कमी वेळात उपलब्ध झाला आहे.लाखो पुस्तके, लेख व त्यासंदर्भातील नोंदी काही सेकंदात सहजपणे उपलब्ध होतात. शिवाय मिळालेला डेटा, त्याचे वर्गीकरण, त्याची तुलना व निष्कर्ष काढणे ए.आय.मुळे शक्य होते. एकंदरीत उच्च शिक्षणातील संशोधनाला गती व गुणवत्ता वाढीस लागली आहे.

 10) दिव्यांगाच्या शिक्षणात मदत- विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात एआयची मदत होते. आज दिव्यांगाना शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या समोर अनेक अडचणी व मर्यादा आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अशा शिकण्यातील अडथळे अचूक मोजता येणे शक्य झाले आहे. दृष्टिदोष,श्रवणदोष असणाऱ्या मुलांच्या शिक्षणातील गती वाढविण्याची सहाय्यक साधने. उदाहरणार्थ स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच फार उपयुक्त होताना दिसतात.

11) कौशल्य विकासाला चालना- विद्यार्थ्यांनी ए.आय. आधारित शिक्षण   शालेय स्तरापासून घेतले तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे सहज शक्य होईल. यामुळे भविष्य काळातील जागतिक बाजारपेठ, त्या बाजारपेठेचे तंत्र,संगणक विज्ञान, रोबोटिक्स डेटा सायन्स, गेम्स, क्वीझ आभासी प्रयोगशाळा याची मागणी वाढणार आहे. या क्षेत्राला खूप चांगले भविष्य असणार आहे. अशा भविष्यातील स्पर्धेत हा विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सक्षम ठरणार आहे.

*कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षणासमोरील आव्हाने*
 कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षणातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक गतिमान होणार असली, तरी तिचा योग्य वापर न केल्यामुळे काही आव्हाने या क्षेत्रासमोर उभे राहणार आहेत. ती समजून घेतली नाही तर शिक्षणातील सर्जनशीलता, मानवता, समानता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

 शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अंतरक्रियेला अधिक महत्त्व असते. या क्रियेतून मुलांचे शिकणे होत असते. एका अर्थाने ती भावनिक नातेसंबंधाची गुंतवणूक असते, त्यातून मूल्ये,संस्कार व मुलांचे सामाजिकरण होत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे माहिती आहे पण भावनिक ओलावा नाही. संवादांतून निर्माण होणारा विश्वास नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि भावनिक विकासाला मर्यादा पडतात.
भावनिक विकाससोबत जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर, आरोग्यावर व त्याच्या मानसिक स्थैर्यावर याचा परिणाम होतो.

 भारत हा विकसनशील देश आहे. या देशात विविधता असल्याने खूप मोठी विषमता आहे  गरीब-श्रीमंत,  शहरी-ग्रामीण असा भेद आहे. याचा परिणाम शालेय पर्यावरणीय वातावरणावर झालेला दिसून येतो. एका बाजूला चकचकीत असणाऱ्या भव्य दिव्य शाळा, तर दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधा नसणाऱ्या पडक्या भिंती, पत्र्याच्या शेडच्या शाळा असे चित्र दुर्दैवाने आहे. परिणामी आधुनिक तंत्रज्ञानाच्या पातळीवर एक समानता नाही. एक प्रकारची डिजिटल दरी या स्तरावर आहे. ती कमी करण्याचे आव्हान सरकार व प्रशासन यांच्या समोर आहे.

 प्रगत साधने असली तरी त्याच्या वापराचेही एक कौशल्य असते. हे कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. शालेय स्तरावर शिक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दल हवी तशी गंभीरता घेतली जात नाही. तंत्रज्ञानाची साधने वापरताना ही प्रशिक्षणे अतिशय दर्जेदार होणे आवश्यक आहे. अनेक शिक्षकांना ए. आय. आल्यानंतर आपल्या भूमिकेचे काय होणार.? याची धास्ती वाटते आहे. यामुळे नकारात्मक सूर अशा प्रशिक्षणाला लावला जाऊ शकतो, त्याचाही विचार करणे आवश्यक आहे.

 ए.आय.ची साधने विकसित करणे, अपडेट ठेवणे, ती कार्यरत ठेवणे. हे जसे कौशल्याचे काम आहे, तसेच ते खर्चीकही काम आहे. हा खर्च शाळा महाविद्यालयांना परवडणार काय.? असा प्रश्न उपस्थित होतो. ए.आय. हे  तांत्रिक साधन आहे. यामुळे तांत्रिक बिघाड त्यात होऊ शकतो. इंटरनेट, वीजपुरवठा, सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाल्यास शिकण्याची प्रक्रिया थांबते. अशावेळस तंत्रज्ञानावर पूर्ण अवलंबित्व असणे हे भारतासारख्या देशाला परवडणारे नाही.

ए.आय. चा संतुलित वापर केला नाही, तर विद्यार्थी शिक्षक यांच्या सकारात्मक क्षमता कमी होण्याचा धोका आहे. गुंतागुंतीचे विचार करण्याची, समीक्षणात्मक विचार करून अचूक निर्णय घेण्याची, चिकित्सक विचार करून नेमका दोष ओळखण्याची, सोबतच सर्जनशील विचाराची क्षमता या तंत्रज्ञानामुळे खुंटण्याची भीती आहे. सर्जनशीलता जर कमी झाली तर त्याचा मानवी जीवनाच्या कलात्मकतेवर परिणाम होईल. या तंत्रज्ञानाकडे पुरवलेला डेटा चुकीचा असेल त्याचे विश्लेषण व त्याचा परिणामही चुकीचा येईल.
असे पूर्वग्रह दूषित चुकीचे निकाल येऊ नये, म्हणून माहिती देताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.

 गोपनीय माहितीचा प्रचंड डेटा ए. आय. कडे असतो. यातून तो वैयक्तिक माहिती पुरवतो. कदाचित ही वैयक्तिक माहिती विकली जाण्याची व चुकीच्या लोकांकडे जाण्याची सुद्धा शक्यता आहे. यामुळे अशा वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊन आपली सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अशी माहिती देण्यावर 'आंतरराष्ट्रीय स्तरावर' काही कायदे होणे आवश्यक आहेत. या संदर्भात आवश्यक ती योग्य, कारवाईची खबरदारी घेण्याची आवश्यक आहे.

*कृत्रिम बुद्धिमत्तेची भविष्यातील दिशा-* 
कृत्रिम बुद्धिमत्तेचा भविष्यात शिक्षण क्षेत्रातील वापर अधिक व्यापक व प्रभावी होणार आहे. याच्या वापरामुळे शिक्षण आणखीन उपयुक्त, गतिमान व आकर्षक होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता, त्याची आवड, गती व कच्चे घटक लक्षात घेऊन ए.आय. मुलांना मदत करेल. प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल शिक्षक मिळतील. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन जलद गतीने होईल,अर्थात सुधारणा सुद्धा लगेच करण्यास भरपूर वाव असेल. सध्या ए.आय.चा वापर मर्यादीत असल्याने, प्रादेशिक भाषेमध्ये अडचणी येत आहेत. नजीकच्या काळात प्रादेशिक भाषेतही मोठ्या प्रमाणात ए.आय वापर उपलब्ध होईल.व्हर्चुअल वर्गखोल्या तयार करण्यात येतील. यामुळे ऐतिहासिक स्थळे, प्रयोगशाळा, अंतराळ प्रवास  डिजिटलरित्या विद्यार्थ्याना अनुभवता येईल.

 तंत्रज्ञानामुळे जगाचे रूपांतर एका खेड्यामध्ये झाले. ए.आय.च्या मदतीने जागतिक शाळा (ग्लोबल क्लासरूम) तयार करण्यात येतील. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मुले एकत्र येऊन 24 तास बारा महिने शिक्षण घेतील. शिक्षण फक्त चार वर्ग खोल्यांमध्ये मर्यादीत न राहता ते संपूर्ण जीवनभर कुठेही व कधीही घेता येऊ शकेल. 

आज तंत्रज्ञानाच्या वापरामुळे 21वे शतक हे खूप प्रगत झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही या शतकाला मिळालेली देणगी आहे. तिच्या वापरामुळे मानवी जीवनातील प्रत्येक क्षण अधिक गतिमान होत आहे, याला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षण करत आहे. शिक्षण अधिक उपयुक्त करण्यासाठी ए.आय.चा उपयोग होणार आहे. तिच्या मदतीने विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध होईल. शिक्षणाची प्रक्रिया सोपी, आकर्षक होईल. शिक्षकांचा वेळ व त्याचे श्रम वाचतील, मात्र ए. आय. चा वापर करताना मानवी संस्कृती, मूल्ये, विद्यार्थी-शिक्षक नाते व शिक्षणातील सर्जनशीलता टिकून ठेवणे आवश्यक आहे. मानवी बुद्धिमत्ता व कृत्रिम बुद्धिमत्ता याचे योग्य संतुलन राखले तर शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळे

-डाॅ. माधव सूर्यवंशी,
शिक्षण अभ्यासक, 
मुख्य समन्वयक, 
शिक्षण विकास मंच, 
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ