उद्योगाचे मॉडेल

 रोबो , एआय नोकऱ्या खात आहे. सध्या कम्प्युटर सायन्स मधल्या नोकऱ्या कमी होत आहेत. एआयमुळं डोक्याचं आणि रोबोटमुळं हाताचं काम जाईल.एआय ,रोबोटला सुटीची / रजेची गरज नाही. साडूचा जाग्रण - गोंधळ नाही. . . ..अगदी टॉयलेट ब्रेकसुद्धा नाही. 24x7 काम. 1835 पासून भारतात मेकॉले शिक्षणपद्धत सुरू झाली आणि कारकुनीची प्रथा आली. खरं तर त्याआधी माणसं नोकरीवगैरे जास्त करतच नव्हती. स्वतःचा छोटामोठा उद्योग व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होती. इंग्रजी अंमलानंतर नोकर बनण्याची मानसिकता अधिकाधिक बळावत गेली. नोकरीची सवय दीडशे दोनशे वर्षांत लागलीहे.  उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे समीकरण बदललं. आत्ता एका जागेसाठी दहादहा हजार अर्ज येतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेत अनेकांना नोकरी  मिळणार नाही  हे तर उघड गुपितच! त्यामुळं उद्योग, व्यवसाय, व्यापार करावाच लागणार. खरंतर नोकरी मिळाली नाही म्हणून बिझनेस करणं ही प्रेरणाच चुकीची वाटते. नोकरीत स्वतःच्या आयुष्याचा रोडमॅप तयार करण्याचे स्वातंत्र्य नसते, उद्योग- व्यवसायात ते असते. नोकर म्हणून जगणं आणि पेन्शनर म्हणून मरणं हा मध्यमवर्गीय माइंडसेट सोडावा लागेल. आपल्याकडं उद्योजक घडवणारी शाळा -कॉलेजं आहेत का? उत्तर निराशाजनक आहे. आपल्या शाळा - कॉलेजांतून आपण नोकरच घडवत आहोत , आणि नोकऱ्यांच्या अभावामुळे बेरोजगारांच्या फौजाच फौजा आपण निर्माण करत आहोत. बिझनेस आपल्यासाठी नाही, आपल्या बापजाद्यांनी केलेला नाही. बिझनेसमध्ये लॉस होतो. धंद्यात कॉम्पीटिशन असते ह्या आपल्या डोक्यात बसलेल्या पारंपरिक मान्यता! भारतात सोन्याचा धूर निघत होता. हा धूर ग्रॅच्युइटी किंवा फंडाच्या रकमेतून थोडाच निघत होता? जगन्नाथ शंकरशेठ या मराठी माणसाने इंग्रजांना पहिली रेल्वे काढायची होती त्यात गुंतवणूक केली होती.              उद्योजकतेचं एकही कॉलेज नाही. वाणिज्य शाखा लिपिक, लेखापाल, लेखा परिक्षक , करसल्लागार तयार करत आहे. गंमत म्हणजे स्वतःचा कोणताही उद्योग- व्यवसाय न काढता पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर आपल्याकडं  अर्थशास्त्राचा प्राध्यापकही होता येते. कोणी म्हणेल मग इतिहासाच्या प्राध्यापकाला युद्धावर पाठवायचे का ? पण तो विषय वेगळाहे, हा विषय वेगळाहे , आपण मानसिकतेसंबंधी बोलतोय हे समजून घ्यायला हवे. जग एवढं झपाट्यानं बदलतंय , की तीन वर्षांचा कोर्स घेतला तर तो कोर्स सुरू करतांना जे जग असतं ते तो कोर्स संपतांना बदललेलं असतं. धंद्याला थोडी वेगळी मानसिकता लागते. अन् ती घडवता येते. उबेर सर्वात मोठा टॅक्सी ग्रुप त्यांची साधी बैलगाडीपण नाही. नेटाफ्लिक्स हे जगातलं सर्वात मोठं सिनेमाघर त्यांचं एकही थिएटर नाही. पेटीएम पैसे देतात पण त्यांचा स्वतःचा पैसा नाही. अलिबाबाचा सर्वात मोठा रिटेल व्यवसाय पण स्वतःची  निर्मिती काहीच नाही. सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचा , सुंदर पिचाई गुगलचा बॉस हे आपल्या एज्युकेशन सिस्टममधूनच तयार झालेत. पण ही उदाहरणं अपवादात्मक आणि संख्या फार कमी आहे. त्यासाठी पोरं सक्षम करावी लागतील. चिमणीचं पोर चाळिसाव्या दिवशी उंच भरारी घेतं .. आपलं 25 - 25 वर्षं पायच धरत नाही. जास्त पाणी देऊन रोपं किती दिवस कुजवायची.लहान वयातच कमवा -शिका आणि स्वावलंबनाचे संस्कार द्यावे लागतील. मुलांसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा ; संपत्ती निर्माण करणारी मुलं तयार करावी लागतील. उद्योजक - यशस्वी व्यक्तींचा सहवास त्यांना उपलब्ध  करून द्यावा लागेल. पोरगं मोठं झालं पाहिजे आणि त्याला स्ट्रेस मात्र नको , असं कसं जमेल? जपान, जर्मनी, चायना उद्योगात पुढं कारण तिथं घराघरात उद्योग  सुरू आहेत. व्हाइट कॉलर जॉब शोधण्यातच आपली कॉलर घामानं काळी होतेय. सिनेमा, क्रिकेट , राजकारणाला महत्त्व देण्यापेक्षा श्रमाला महत्त्व द्यावं लागेल. लोकांच्या गरजांचं डोळस निरीक्षण केलं की त्यातूनच स्वयंरोजगाराचा शोध लागतो.वाळवणं , खारवणं, मुरवणं यातून सुद्धा छोटेछोटे उद्योग उभे राहू शकतात. जगात प्रत्येकासाठी एक वेगळं करिअर असू शकतं कारण तुम्ही युनिक आहात. फक्त रिकामटेकडे उद्योग करण्यापेक्षा काहीतरी उत्पादक उद्योग करावे लागतील. क्रिकेटपटूला एकावेळी कसोटी मॅचचे 16 लाख मिळतात.पण 150 कोटीतून 16 च खेळाडू निवडले जातात. त्यामुळं अशी क्षेत्रं निवडली तर आपला नंबर कधी येणार? पिढ्या न पिढ्या मान ताणत झाडांवरची पाने खात असल्याने जिराफ लांब मानेचे झाले . तर शहामृग , इमू यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. आता तर पंख असूनही त्यांना उडता येत नाही. शिक्षणातून आपणास पोपट बनवायचे आहेत की गरूड? स्वराज्य नावाचं असं काही  मॉडेल पूर्वी नव्हतं , स्वराज्य नावाचं मॉडेल प्रथम शिवाजी महाराजांनी घडवलं. आपणपण आपलं उद्योगाचं मॉडेल उभं करायला हवं .मोठी माणसं देवाहून कमी नसतात. पण मोठ्या माणसांच्या सावलीत खुरटायचं नाही. आपण आपली सावली निर्माण करायची. शेवटी नोकरीच्या दारातून स्वतःला कितीवेळा ढकलून घ्यायचं ? .... याचा विचार करायलाच हवा.    

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ