दगडालाही चुकले नाही
*दगडालाही चुकले नाही...*
-डॉ.प्रतिभा जाधव
-------------------------------------
क्षेत्र कोणतेही असो; ‘एकटे पाडणे, बहिष्कृत करणे, वाळीत टाकणे.’हे शब्द तुम्ही ऐकता तेव्हा त्याचे विशेष काही वाटत नाही परंतु जेव्हा ते अनुभवता तेव्हा त्याच्या वेदना किती त्रासदायक असतात? ते कळत अन जाळतही जाते. शक्यतो सुमार बुद्धीच्या वा ‘होयबा’वादी लोकांच्या वाट्याला हे ‘एकटे पाडणे’ येत नसते. व्यक्तीत काही असामान्य कौशल्य गुणवत्ता, बुद्धिमत्ता असल्यास अनेकांन ते मोठ्या मनाने स्वीकारता येत नाही व अशा व्यक्तीस पाण्यात पाहणाऱ्यांचीच संख्या वाढू लागते. एखाद्याच्या कर्तुत्वाची रेष मोठी झाली की, सुमार बुद्धीचे लोक असुरक्षित होतात. जळजळ-मळमळ सुरु होते, स्वतःच्या अपयशाच्या दु:खाचे विरेचन करण्यासाठी मग समगुणी लोक एकत्र येत कंपू, टोळी तयार करून समोरच्याला नामोहरम करण्यासाठी विविध डाव रचतात. हे माग खेचणारे खेकडे आपल्यापेक्षा कित्येक पायऱ्या खाली असतात व पायरीप्रमाणेच वर्तन करत असतात.
बहुतांश कल्पक व प्रामाणिक लोक आपल्या काम, जबाबदारीस महत्व देतात. त्यांना इतरांच्या आयुष्यात लुडबुड करण्यास सवड असते ना रस. जिज्ञासू व ध्येयशील असल्याने ‘नवे ते हवे’ व ‘वेळेचे मूल्य’ याकडे ते गांभीर्याने पाहतात. गर्दीचा भाग बनून जगणे आणि बघे म्हणून उरणे त्यांना सपशेल नामंजूर असते. त्यांच्या दिवसातील प्रत्येक तासाचे नियोजन असते म्हणून गप्पा मारण्यात व्यर्थ वेळ न दवडता ते कमी बोलून आपले काम परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात व यशस्वीही होतात. आपले कर्तव्य हेच प्राधान्य मानणारे लोक बहुतांश कार्यालय, एकत्र कुटुंब वा संस्था-संघटनेत इतरांच्या रडारवर येतात, हेतुत: एकटे पाडले जातात, त्यांच्याबद्दल भ्रम निर्माण केले जातात. मानसिक खच्चीकरण केले जाते आणि तसेही राजकीय क्षेत्रापेक्षा इतर सर्वच क्षेत्रात अधिकचे गडद भेसूर राजकारण फोफावते आहे.
मानव मुलत: समाजशील प्राणी आहे. मितभाषी असो व व्यग्र त्याला समाजाचा एक भाग बनून राहणे अपरिहार्य असते. शक्यतो स्वयंसिद्ध लोकांना नकारात्मकतेस तोंड द्यावेच लागते. त्यातही उपवर्गीकरण लिंग, जात, धर्म, प्रदेश, भाषा ह्या सोयीने होतेच. आजही स्त्री वा मागास जात समुहातील व्यक्तीच्या वाटेत पावलागणिक काटे पेरले जातात. ‘विषमता संपली आहे’ किंवा ‘आम्ही कुठलाही भेदभाव पाळत नाही’ म्हणणारेच खरे दांभिक असतात. त्यांचे भाव, चेहरे यांना वरकरणी बेगडी मुलामा दिलेला असतो व मनात जहरी विषाचे रांजण काठोकाठ भरून जपलेले असतात. स्वत:त कौशल्याचा अभाव वा न्यूनता असली म्हणजे यशस्वितांची आगेकूच यांचा निद्रानाश करते. प्रगती करणाऱ्यांची निंदानालस्ती करून हे बापडे आपल्या नाकर्तेपणाचे दु:ख त्यामागे लपवून स्वतःचे समर्थन करतात. हे स्वसमर्थन करणारे भवताली मोठ्या संख्येत दिसतात म्हणूनच तर कामात चोख असणारे लोक ‘खास’ ठरतात व त्यांच्या कर्तुत्वाने तळमळणारे बिचारे नेहमीच ‘आम’ राहतात.
कामाच्या ठिकाणी असो वा कुटुंबातील नाती असोत प्रामाणिक लोकांना एकटे पाडण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की कामातील राजकारण, प्रामाणिक लोकांचे यश पाहून येणारी असुरक्षितता. अनेकदा कामाच्या ठिकाणी राजकारण आणि गटबाजीमुळे प्रामाणिक व तत्वनिष्ठ व्यक्तींना एकटे पाडले जाते. सहकारी किंवा व्यवस्थापन त्यांना सामावून घेण्यासाठी तयार नसते. हे शारिरीक शोषणापेक्षाही जीवघेणे असे मानसिक शोषण असते. भारतात अनेक ठिकाणी असे ‘स्लो पॉयझानिंग’ करून बुद्धिवंतांचे बळी घेतले गेले आहेत. बहिष्कृत करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला समाजातून, संस्थेतून किंवा एखाद्या विशिष्ट गटातून बाहेर काढणे, वगळणे किंवा नाकारणे. याचा अर्थ एखाद्याला संबंध तोडून बाजूला करणे, त्यांच्यापासून दूर राहणे किंवा त्यांच्यात सहभागी न होणे. ही एखाद्याचा विरोध दर्शवण्याची हीन पद्धत आहे. यालाच आधुनिक अस्पृश्यता असेही म्हणता येईल. ज्ञान-तंत्रज्ञानातील एवढे तारे तोडूनही आदिमानवापेक्षाही भयंकर वैचारिकता बाळगणाऱ्यांनी नेमकी कोणती प्रगती साधली आहे? हा मोठ्ठाच किचकट प्रश्न आहे बुवा!
एकटे पाडणे वा एकाकीपणा, एकांताचा स्वतःच्या प्रगतीसाठी कौशल्याने वापर करणारे लोकही मी पाहिले आहेत. कारण कमी बोलल्याने काम एकाग्रतेने होते, विचलित होण्याचे प्रमाण कमी होते. विचारांवर आणि कामावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते व कामाला प्राधान्याने जास्त वेळ दिला जातो.नवीन प्रकल्प स्वीकारता येतात, तडीस नेता येते, खूप काही नवे शिकता येते. कमी बोलल्याने फोन कॉल, सहकाऱ्यांशी बोलणे किंवा बैठकांमध्ये कमी वेळ जातो. मेंदूला विचार व कामाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायला वाव मिळतो, कामाची गुणवत्ता सुधारते. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा लोक तुमचे बोलणे अधिक लक्षपूर्वक ऐकतात. मोजके बोलणे हिताचे कारण त्यामुळे गैरसमज टाळता येतात आणि म्हणणे स्पष्टपणे मांडता येते.बोलण्यापूर्वी शब्द काळजीपूर्वक निवडावेत. अनावश्यक बोलणे टाळल्याने तुमच्या शब्दांची किंमत वाढते आणि तुमचा मानही राखला जातो.
ध्येयशील व्यक्तीसाठी वेळेचे महत्त्व अनमोल आहे कारण वेळ हा अमूल्य आणि परत न येणारा स्रोत आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्याने ध्येये गाठता येतात, उत्पादकता वाढते, शिस्त लागते आणि कामासोबतच वैयक्तिक जीवनात संतुलन राखता येते. वेळेची किंमत ओळखणे म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देणे होय. यशस्वी व्यक्ती वेळेचा प्रभावी वापर करतात. वेळेचा योग्य वापर केल्याने शिस्त लागते. अभ्यास, खेळ आणि इतर व्यवस्थापन करण्याची सवय लागते व त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वांना समान मिळते, परंतु यशस्वी लोक व इतर तिचा वापर कसा करतात? यात फरक असतो. योग्य वेळी केलेल्या कामामुळे ज्ञान आणि संधी उपलब्ध होतात. शांत, एकांतप्रेमी व्यक्ती आणि प्रगतीचा संबंध सकारात्मक आहे. शांत व्यक्ती योग्य निर्णय घेतात, त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतात आणि इतरांकडून मान्यता भूक त्यांना नसते. ते आपण काय आहोत? कसे आहेत? आपली कुवत काय? याबाबत स्पष्ट असतात. याच गुणांमुळे त्यांना प्रगती साधता येते. तेव्हा वाचा, बघा, लिहा, शोधा; संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. इथे इंदिरा संतांची कविता किती जुळते बघा-
‘किती दिवस मी मानित होते, ह्या दगडापरी व्हावे जीवन
पडो ऊन वा पाऊस त्यावर, थिजलेले अवघे संवेदन
खिळवून ज्याच्यावरती डोळे, मनात यावे असले काही
तोच एकदा हसून म्हणाला, दगडालाही चुकले नाही.
चुकले नाही चढते त्यावर, शेवाळाचे जुलमी गोंदण
चुकले नाही केविलवाणे, दगडफुलाचे त्यास प्रसाधन’
*-डॉ. प्रतिभा जाधव*
pratibhajadhav279@gmail.com
लेखिका साहित्यिक, वक्ता व एकपात्री कलाकार आहे
Comments
Post a Comment