बोगस पदव्या
चौकात एक दुकान उभं राहीलं.त्यावर पाटी होती इथं पदव्या विकत मिळतील.मग एक राजा तिथ गेला त्यानं स्वतःला सगळ्या पदव्या विकत घेतल्या.त्याच्याकडे सत्ता होती पैसा होता.मग तो त्या दुकानदाराला म्हणाला “अहो,माझ्या घोड्यासाठी एखादी पदवी विकत द्या मला.लहानपणापासून तो माझ्यासोबत आहे.”
दुकानदार हात जोडत म्हणाला, “माफ करा साहेब आम्ही घोड्यांना नाही गाढवाना पदव्या विकतो..”
त्याने दिलेलं उत्तर हे आजच्या शैक्षणिक अवस्थेला समर्पक उत्तर आहे.
आजपर्यंत ढगफुटीने खचलेला शेतकरी आता पेपरफुटीने घाबरून गेलाय.कारण बांधावर बसून अभ्यास करणाऱ्या त्याच्या लेकरांच्या स्वप्नांचा खून या व्यवस्थेने करायला सुरवात केलेली आहे.
इथला शेतकरी,मोलमजुर आणि मध्यमवर्गीय माणूस आपल्या मुलाला डॉक्टर बनवू शकणार नाही हे लाज आणू पाहणारं सत्य उघड झाल्यानंतरही चौकात जमाव होत नाही याचा अर्थ आपण संपलो आहोत असाच आहे.
कारण 20 मार्काला अभ्यासक्रमात असणाऱ्या नागरिकशास्त्र शिकलेल्या फालतू मेंढरांची गर्दी म्हणजे तुम्ही आम्ही आहोत.राग येऊ देऊ नका माझा पण तुम्हाला राग आलाच तर तुम्ही काहीही व्यक्त करू शकत नाहीत ही तुमची अवस्था आहे.ती अवस्था माझी ही आहे.
आज चोर सापडले म्हणून चोरी झालेली होती असे नाही.चोरी आजपर्यंत होतच होती.फक्त चोर सापडले नव्हते.म्हणजेच समाजात कितीतरी डॉक्टर आज असे आहेत जिथं खोकल्यावर औषध म्हणून हगवणीचे इंजेक्शन देत असणार.आणि त्यातलं तुम्हाला आम्हाला काय कळणार आहे.
आजवर मटका माफिया,खून माफिया,वाळू माफिया अशा अनेक गुंडांचा असणारा हा देश आता शिक्षण माफियांचा देश म्हणून ओळखला जाईल.असो…
Comments
Post a Comment